घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमी

सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची दुर्घटना घडली. होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोकं अडकल्याची माहिती होती. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आता 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीये. तर 43 जण जखमी झाले आहेत. अद्याप होर्डिंगखालून 74 जणांना बाहेर काढलं असल्याची माहिती आहे. अशातच आता होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. (120 बाय 120 फुटाचा हा बॅनर होता) राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच्या आजूबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होल्डिंग बॅनर आहे त्याच्यावर देखील पालिका कारवाई करत आहे. मात्र याचदरम्यान नवीन माहिती समोर येत आहे. घाटकोपर येथे याच जागेवर अनधिकृत चार महाकाय जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. ते फलक दिसावे म्हणून आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने फेब्रुवारीत घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत हे आदेश दिले. या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरातील हवामानाचे अंदाज आवर्जून दिले आहेत. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील पावसाचा अलर्ट रेल्वे प्रशासन, मुंबई महानगरपालिका, वाहतूक विभाग, पोलीस विभाग, मुंबई विमानतळ, प्रशासनसह इतर सर्व महत्वाच्या विभागांना देण्यात आला होता.

हवामान विभागाच्या अलर्टनंतर रेल्वे प्रशासन अलर्ट राहिले नाही. यामुळे एका वादळात मुंबईतील लोकसेवा ठप्प झाली. मध्य रेल्वे वाहतुकीने मान टाकली. वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्य रेल्वेवरील लोकल उशीराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालयामध्ये जाणाऱ्या चाकरमानी लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.