विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात निर्णायक आणि कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या भयानक हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने आता पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर पूर्णतः बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
ही बंदी केवळ थेट आयातीपुरती मर्यादित नाही, तर पाकिस्तानातून इतर देशांमार्फत (indirect) होणाऱ्या आयातीवरही लागू आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून, भारताने याआधी कधीही न केलेला एवढा व्यापक आर्थिक झटका पाकिस्तानला दिला आहे.
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, परराष्ट्र व्यापार धोरण 2023 (Foreign Trade Policy – FTP) मध्ये नव्या तरतुदीचा समावेश करत, “पाकिस्तानमध्ये उत्पादित किंवा तिथून निर्यात होणाऱ्या कोणत्याही वस्तूंची थेट किंवा अप्रत्यक्ष आयात तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येते,” असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असून कोणताही अपवाद फक्त केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच मान्य केला जाईल.
या निर्णयामागे राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाचे रक्षण करण्याचा उद्देश असल्याचे डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने स्पष्ट केले आहे.
या निर्णयाच्या पुढच्या टप्प्यात भारत सरकारने समुद्री वाहतुकीवर देखील निर्बंध लावले आहेत. पोर्ट्स, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्रालयाने पाकिस्तानच्या ध्वजाखालील कोणत्याही व्यापारी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
त्याचप्रमाणे, भारतीय झेंड्याखालील जहाजांनाही पाकिस्तानमधील कोणत्याही बंदरावर थांबण्यास मनाई करण्यात आली आहे.
ही बंदी Merchant Shipping Act, 1958 च्या कलम ४११ अंतर्गत लागू करण्यात आली असून, भारतीय मालमत्ता, बंदरे, आणि व्यापार सुरक्षित ठेवणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की,“देशहित लक्षात घेता भारतीय व्यापारी सागरी सेवेचा विकास आणि सुरक्षेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच या बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.”
या बंदीमुळे पाकिस्तानला केवळ आर्थिक झटका बसणार नाही, तर त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि व्यापार तळाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत ही पाकिस्तानसाठी मोठी निर्यात बाजारपेठ होती, आणि या बंदीमुळे अनेक पाकिस्तानी उद्योग, विशेषतः कापड, फळे, हॅंडीक्राफ्ट आणि अन्नपदार्थ व्यवसायांवर मोठा परिणाम होणार आहे.
