विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर देशभरातून संताप व्यक्त होत असताना एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी थेट पाकिस्तानला सुनावलं आहे. पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या भूमिकेवर होणाऱ्या टीकेवर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले “माझे ऐकत राहा, तुमच्या डोक्यात जो भूसा भरला आहे, तो साफ होईल.” ( Keep listening to me the chaff in your head will be cleared Asaduddin Owaisis stern warning to Pakistan)
ओवैसी म्हणाले, “पाकिस्तानातील काही लोक सतत माझ्यावर टीका करत आहेत. मी म्हणतो, माझ्याकडे बघत राहा, माझे ऐकत राहा… यातून तुमचंच ज्ञान वाढेल. माझ्यासारखा स्पष्टवक्ता आणि हँडसम माणूस तुमच्या देशात नाही.ऑपरेशन सिंदूरसारख्या लष्करी कारवायांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पाकिस्तानसारख्या देशाला भारताची ताकद कधीच समजली नाही. त्यांच्या गोंगाटाला घाबरण्याची आता वेळ राहिलेली नाही.”
परदेशात पाठवण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावर मत व्यक्त करताना ओवैसी म्हणाले, “ही उपयुक्त गोष्ट आहे. भारतात घडणाऱ्या दहशतवादी घटनांची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणं आवश्यक आहे. आपल्या भूमीवर झालेली क्रूरता, निष्पापांचे बळी आणि दहशतवाद्यांची कृत्यं यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश होणं गरजेचं आहे.”
ओवैसींनी ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की, “अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात आणि 26/11 नंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारनेही असाच प्रयत्न केला होता. तेव्हा पाकिस्ताननं खोटं बोलून अणुबॉम्बचं ढोल बडवायला सुरुवात केली. पण अणुबॉम्ब केवळ दाखवण्यापुरताच आहे. इस्रायल आणि इराणकडेही अणुबॉम्ब आहेत, पण ते थांबले का?”
ते म्हणाले, “आमचं राजकारण वेगळं असलं तरी देशासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पूंछमध्ये मृत्यू पावलेली दोन जुळी मुलं, शहीद झालेले जवान, मृत नागरिक आणि उद्ध्वस्त झालेली घरे या सर्वांची माहिती जगासमोर ठेवणं ही आमची जबाबदारी आहे.”
भारत हा साधा देश नाही. तो जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारतात जर काही अडचण निर्माण झाली, तर त्याचे परिणाम थेट आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होतात. हे पाकिस्तानने आणि जगानेही लक्षात ठेवावं, असेही ते म्हणाले.
