काश्मीरला वंदे भारतची ऐतिहासिक भेट : उद्यापासून श्रीनगर-कटरा दरम्यान रेल्वे सेवा सुरू, चीनच्या ब्रिजलाही मागे टाकणारे अभियांत्रिकी चमत्कार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या एकात्मतेचा नवा अध्याय लिहणारा ‘उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक’ (USBRL) प्रकल्प अखेर पूर्णत्वास गेला असून, या प्रकल्पावर पहिली वंदे भारत एक्सप्रेस उद्या (६ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मूमधील कटरा स्थानकावरून श्रीनगरकडे रवाना होणार आहे. ही सेवा केवळ जम्मू-कश्मीरसाठीच नव्हे, तर देशभरातील प्रवाशांसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. ( Vande Bharats historic gift to Kashmir Train service between Srinagar-Katra to resume from tomorrow an engineering marvel that surpasses even Chinas bridge)

वंदे भारत एक्सप्रेस ही अर्ध-हायस्पीड ट्रेन कटरामधील श्री माता वैष्णो देवी स्थानकापासून श्रीनगरमधील नवगाम स्थानकापर्यंत धावणार आहे. यामध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित दरवाजे, अँटी-स्पॉल सुरक्षा प्रणाली, हीटिंग यंत्रणा, उष्णतारोधक शौचालये व हिमवर्षेतदेखील सुरळीत सेवा देणारी विशेष हिवाळी संरचना आहे. विशेष म्हणजे, बर्फ हटवणारी ट्रॅक क्लिअरिंग ट्रेन गाडीच्या आधी धावणार असून, -२०°C तापमानातही ही सेवा अखंड चालू राहणार आहे.

USBRL हा भारतातील सर्वांत गुंतागुंतीचा आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. सुमारे ₹४३,७८० कोटींच्या खर्चाने उभारलेला २७२ किमी लांबीचा हा प्रकल्प हिमालयाच्या अतिशय कठीण व दुर्गम भूप्रदेशातून मार्गक्रमण करतो. यामध्ये एकूण ९४३ पूल व ३६ बोगद्यांचा समावेश असून, यातील T-50 हा देशातील सर्वात लांब (१२.७ किमी) रेल्वे बोगदा आहे. या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पिर पंजाल पर्वतरांगेतील ११.२१५ किमी लांबीचा बाणिहाल–काझीगुंड रेल्वे बोगदा, जो जम्मू-कश्मीरला संपूर्ण भारताशी जोडणारा प्रमुख दुवा ठरतो.

या मार्गावर दोन अभूतपूर्व अभियांत्रिकी कारागिरीचे नमुने म्हणून उभे आहेत. चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, समुद्रसपाटीपासून ३५९ मीटर उंचीवर. हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. अंजी खड्डी ब्रिज भारतातील पहिला केबल-स्टे प्रकारचा रेल्वे पूल आहे. ९६ स्टे केबल्सच्या साहाय्याने आधारलेला आणि ३३१ मीटर उंच पूलांवरून वंदे भारतचा प्रवास रोमांचक व स्मरणीय ठरणार आहे.

या मार्गाने जम्मू-कश्मीरमधील शेवटच्या टप्प्यापर्यंत रेल्वे पोहोचणार असल्याने प्रादेशिक व्यापार, पर्यटन, लष्करी वाहतूक आणि सामान्य नागरिकांची दळणवळण यामध्ये क्रांतिकारी बदल होणार आहे. विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये संरक्षणसंबंधी वाहतूक अधिक वेगाने व सुरळीत होणार आहे.

USBRL प्रकल्प हे केंद्र सरकारच्या सीमावर्ती विकास धोरणाचे ठोस उदाहरण आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दिशेने सुरु केलेले प्रयत्न आता यशस्वी ठरत आहेत. USBRL, वंदे भारत आणि अभियांत्रिकी आश्चर्यांमुळे भारताची रेल्वे व्यवस्था केवळ तांत्रिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनेही अधिक मजबूत झाली आहे.