नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ, जगातील सर्वात वेगाने प्रवास करणारी बॅगेज सिस्टीम उभारणार

नवी मुंबई: नवी मुंबई :देशातील सर्वात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.( Worlds fastest baggage system Navi Mumbai airport take off
by end of September)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम सिस्टिम’ विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिली. सद्यस्थितीत विमानतळाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उडणार, याची ग्वाही त्यांनी दिली. या विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

विमानतळावरील कामांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या सद्यःस्थितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, “नवी मुंबई विमानतळ हे केवळ एक प्रवासाचे ठिकाण न राहता, हे ‘फ्युचर रेडी’ एअरपोर्ट असेल. इथे प्रवाशांना बॅगेज ट्रॅकिंगसाठी ३६० डिग्री बारकोड स्कॅनिंगची सुविधा असेल. जगातील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या बॅगेज सिस्टीमपैकी एक याठिकाणी कार्यान्वित केली जाणार आहे. विमानतळावर एक किमीपर्यंत चालण्याऐवजी ‘ट्रॅव्हलर’ सुविधा’ (ऑटोमेटेड वॉकवे) देण्यात येणार आहे. त्यामुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना कोणतीही अडचण भासणार नाही.”

या भव्य प्रकल्पाच्या उभारणीत दररोज १३ ते १४ हजार कामगार झटत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या विमानतळाचे दोन्ही रनवे पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर वर्षाला तब्बल ९ कोटी प्रवाशांसाठी सेवा देता येणार आहेत. मुंबई विमानतळाच्या तुलनेत हे विमानतळ अधिक विस्तृत आणि आधुनिक असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

या विमानतळावर पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतील. अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेनची सुविधा दिली जाणार असून त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर थेट पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. याशिवाय जलमार्गाद्वारे ‘वॉटर टॅक्सी’ची सेवा देखील कार्यान्वित केली जाणार आहे. नवी मुंबई, ठाणे, पनवेल, खोपोली, कल्याण या परिसरातील नागरिकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मार्गिका व विशेष कनेक्टिव्हिटी नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनवणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ होणार आहे, त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार आहे. जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या २४ जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ प्रवेशद्वार परिसरात छत्रपतींचे जीवनदर्शन घडेल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.