विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) सोमवारपासून तीन दिवस अज्ञात स्थळी कार्यशाळा होणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता कपड्याची बॅग घेऊन थेट शिवतीर्थावर या, असे फर्मान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जारी केले आहे. या गुप्त बैठकीत शिवसेना ठाकरे गटाशी युती होणार की स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा निर्धार केला जाणार याबाबत उत्सुकता आहे. ( MNS leaders at an unknown location for three dayswill they form an alliance with the Thackeray group or are they determined to fight on their own in the local self-government bodies?)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे)आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मात्र कुठल्या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे यांनी शनिवारी पक्षाचे नेते, सरचिटणीस, शहरप्रमुख आणि विभाग अध्यक्षांना फर्मान जारी केले आहे. या आदेशानुसार सोमवारी सकाळीच सर्वांनी दोन दिवसांच्या बॅग भरून शिवतीर्थावर दाखल होण्याची सूचना केली आहे. त्यानंतर दोन दिवसांसाठी मुंबईच्या बाहेर कार्यशाळेसाठी जायचे असून याबद्दल कुठेही बोलू नये, अशी तंबीही त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
सोमवार ते बुधवार तीन दिवस इगतपुरी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विविध विषयांवर राज ठाकरे नेते, विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आदींना मार्गदर्शन करणार असल्याचे मनसेच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मनसेने केलेल्या जोरदार विरोधानंतर हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. मनसेने पुकारलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही मैदानात उतरला होता. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात आला त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र एका मंचावर आले होते.
मात्र त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर मत प्रदर्शन करू नये, अशी ताकीद राज ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर आता यासंदर्भातील चर्चेसाठी राज ठाकरे यांनी थेट नेतेमंडळींची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा इगतपुरी येथे आयोजित केली आहे.
या कार्यशाळेमध्ये राज ठाकरे स्वतः सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेतील चर्चेचा केंद्रबिंदू कोणता असणार, याविषयी पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, काही वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार दोन संभाव्य मुद्द्यांवर भर असू शकतो. हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आलेली जवळीक, तसेच अलीकडील विजयी मेळाव्यात दोन्ही नेत्यांचा एकत्र मंचावर होणारा सहभाग, यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीची शक्यता चर्चेत आहे. त्यावर पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेतले जाऊ शकते
मात्र, राज ठाकरे यांचा पूर्वीपासूनचा ‘स्वबळावर निवडणूक लढवण्याचा’ आग्रह लक्षात घेता, ही कार्यशाळा पक्षाच्या अंतर्गत संघटनबांधणी, प्रचारतंत्र, डिजिटल मोहिमा आणि स्थानिक मुद्द्यांवरील भूमिका ठरवण्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची असणार आहे.स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या तयारीची चर्चाही होऊ शकते.
