आडवा येईल त्याला उचला, ३५३ दाखल करा, हिंजवडीतील समस्येवर अजित पवारांचे आदेश

विशेष प्रतिनिधी

पुणे : आता तुम्ही कोणाचंही ऐकू नका. सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा. जो आडवं येईल त्याला उचला. त्याशिवाय हे होणार नाही, अशा कडक सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी दिल्या. ( Whoever Obstructs Arrest Them File Charges Under Section 353 Ajit Pawars Stern Orders on Hinjawadi Issues)

अजित पवार रविवारी पहाटे सहापासून आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर होते. अधिकाऱ्यांनी सरकारी रस्ता अडवणाऱ्या लोकांबाबत अजित पवारांना सांगितलं. त्यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सांगितल्यावर अजित पवारानी अशा लोकांवर कडक कारवाईचे आदेश दिले. पवार म्हणाले, ज्याच्या मालकीची जागा जात असेल त्याला मोबदला देऊ. त्याचे नुकसान करायचे आपले काही काम नाही. जे काय करायचंय ते करून घ्या. पण आपल्या मालकीचा रस्ता, आपल्या डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याकरता परत पैसे देण्याचा काही संबंध येत नाही. तुम्ही त्यात पाठपुरावा करा,. रस्ते छोटे ठेवू नका, मोठेच्या मोठे रस्ते करा. फोर लेन रस्ते करा.

राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान नगरी असलेल्या हिंजवडी आयटी क्षेत्राला अधिक चालना देण्यात यावी. या भागातील वाहतूक व्यवस्था विनाअडथळा आणि जलद गतीने कशी करता येईल, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यासाठी काही नवीन रस्ते प्रस्तावित करा, असे त्यांनी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले.
या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, एमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नैसर्गिक ओढे – नाल्याभोवती अतिक्रमण तसेच प्रवाह अडवल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह इतर भागात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. या भागातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी रस्ते रुंद करत विनाअडथळा वाहतूक सुरळीत होईल, अशा उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

हिंजवडी, माण, मारुंजीसह शहर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी नवीन रस्त्यांची आखणी तसेच रस्ते मोठे करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिंजवडीसह परिसरातील रस्ते खराब झाले असून त्याची तातडीने दुरुस्ती करत नाल्यातील अनधिकृत बांधकामे पाडावीत, नाल्यांचा प्रवाह कोणी बदलला, याची चौकशी करत अशा बांधकामांवर कठोर कारवाईचे निर्देश, यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले. यासह पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खुला करत, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आराखड्यातील रस्ते तसेच नवीन रस्त्याची आखणी करत यासंबंधी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. बैठकीत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हिंजवडी भागात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच रिंग रोडच्या कामाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.