तेव्हा उद्धव ठाकरेंनी मोदींचे बूट चाटले का? रामदास कदम यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला बाहेर बसवून एकट्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तेव्हा उद्धव ठाकरे मोदींचे बूट चाटत होते का असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. ( Did Uddhav Thackeray lick Modis boots thenRamdas Kadams question)

गुरु पौर्णिमेच्या दिवशी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावरून ठाकरे गट शिंदे यांच्यावर टीका करत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, ठाकरे गट भाजपाला बदनाम करत आहे. तुमचे संजय राऊत प्रत्येक सभेमध्ये एकनाथ शिंदे मोदीजींचे बूट चाटायला दिल्लीला गेले होते, असे म्हणतात. पण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिल्लीला घेऊन गेले होते. त्यावेळी अजित पवार यांच्यासह सगळ्या पक्षाच्या लोकांना केबिनमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकटेच आतमध्ये गेले होते. तेव्हा उद्धव ठाकरे मोदीजींचे बूट चाटत होते का? असा सवालही रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांना केला.
मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीय, भाजपाच्या लोकांना बदनाम करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त महानगरपालिका आहे. उत्तर भारतीयांना आणि भाजापला बदनाम करण्याशिवाय महानगरपालिका कदाचित मिळणार नाही असं त्यांना वाटतंय असा आरोप करून रामदास कदम म्हणाले, दाव्याने सांगतो की मुंबई महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच भगवा फडकणार आहे.

उद्धव ठाकरेंनी हातामध्ये रुद्राक्ष बांधले होते. आता ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत. ते स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आपल्या काही माणसांना पाठवायचे. मला याबाबत माहिती आहे. पण मी यावर बोलणार नाही.पंधरा दिवसांच्या आधी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना भेटायला दिल्लीमध्ये कोण कोण गेलं होत? तिथे काय प्रस्ताव ठेवला? याची सगळी माहिती आली आहे.वेळ आली तर त्यावरही मी बोलणार आहे, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात राज्याचे मंत्रालय त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी आणून ठेवले होते. ते अडीच वर्षांमध्ये फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले होते. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून मंत्रालयाचे कामकाज केले. उद्धव ठाकरेंनी मंत्रालय आपल्या मातोश्रीवर आणलं होतं, यावर त्यांनी बोललं पाहिजे, अशी टाका रामदास कदम यांनी केली