मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात आपल्याबद्दल लिहिण्यावरून अजित पवार यांनी ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना चांगलेच झापले होते. यावरून आता राऊत यांनीही माझ्यावरती खापर का फोडता असे म्हणत अजित पवारांवर पलटवार केला आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, माझ्यावरती का बोलता. मी महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून? मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. माझ्यावरती खापर का फोडता? जेव्हा शिवसेना कुठली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. आमचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की आपल्याबरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा. त्याचे लचके तोडले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल आणि त्यासाठी जर कोणी आमच्यावर खापर फोडत असेल हरकत नाही.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी लिहिले होते की, महाराष्ट्राला व मराठ्यांना दुहीचा शाप आहे व ती दुही घरातूनच सुरू होते. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे.
मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा. शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण?’संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भाऊबंदकी हा मानवजातीला दिलेला शाप असेल, परंतु सत्तेसाठी माणसे कोणत्या थराला जातात याचे अनेक धडे इतिहासात आणि वर्तमानातही आपण पाहत असतो, असेही म्हटले होते.
राऊत यांनी ही चर्चा सुरू केल्यानंतर अजित पवार यांच्या नाराजीचे वृत्त वेगाने पसरले. ईडीच्या दबावामुळे अजित पवार भाजपकडे जात असल्याचे राऊत यांनी सुचित केले होते. यावर अजित पवार यांनी राऊत यांना चांगलेच सूनावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसविषयी सुरु असलेल्या चर्चांविषयी बोलायला आमच्या पक्षाचे प्रवक्ते समर्थ आहेत. उगाच दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी आमचे प्रवक्ते म्हणून बोलू नये. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी, आमचे वकीलपत्र त्यांनी घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी राऊतांना लगावला होता.
