कोणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका असणार आहेत. तसेच पुढच्यावर्षी आधी लोकसभेच्या आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात नेमकं काय-काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात प्रचंड हालचाली घडत आहेत. असं असताना अहनदनगरमध्ये काल एक अतिशय विक्षिप्त प्रकार समोर आला. अहमदनगरमध्ये काल एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असाता त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे मान्य केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही”, असं फडणवीस म्हणाले.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी इम्तियाज जलील यांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं म्हटलं होतं. पण जलील आणि एमआयएम यांचं औरंगजेबाबद्दलचं प्रेम लपून राहिलेलं नाही. कारण एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या समाधीस्थळी जात पुष्पहार अर्पण करत नमस्कार केला होता. वाशिम जिल्ह्यातही बॅनरवर औरंगजेबाचे छायाचित्र, बॅनरवर लावण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्यानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता.