विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज शासनाने आज मंजूर झाला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने नागरिक तसेच प्रशासनात आश्चर्य व्यक्त होत आहे.

विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. मराठवाड्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे सुरु केला होता. या सर्व्हेनंतर त्यांनी खरीप आणि रब्बी दोन हंगामाच्या सुरवातील पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी हजार एकरी मदत करण्याचा निकष काढला होता. तसा रिपोर्ट सरकारकडे पाठवला होता. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे सरकार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती.

आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर सध्या विभागीय आयुक्त आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला होता. केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले.

राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांच्या नावाची नेहमी चर्चा असते. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्यात केंद्रेकर नेहमी चर्चेत राहिले आहेत. बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली झाली आणि अख्खा बीड त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता. शेतकरी कुटुंबातून आलेल्या केंद्रेकरांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपयोजना राबवण्याचा प्रयत्न केला.