औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणे चुकीचे – रामदास आठवले

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतले होते. तिथे त्यांनी औरंजेबाच्या कबरीवर चादर चढवली होती. मात्र या कृतीवरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. भाजपकडून त्यांना लक्ष्य केले जात असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी जाणे अयोग्य आहे. आंबेडकरी चळवळ मुस्लिमांना पाठिंबा देणारी आहे. औरंगजेबला पाठिंबा देणारी नाही. आमचे मुस्लिम समाजाला आवाहन आहे की, आमचे सरकार आपल्या समाजासाठी अनेक कामं करत आहे. राज्यातील अन् देशातील नागरिकांचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांकडून अशी कृती करून मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे आठवले म्हणाले.

“औरंगजेब आता गेला आहे. औरंगजेब इथला नाही. भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदूच होते. ते हिंदू होण्यापूर्वी सर्वजण बौद्ध होते. बौद्ध होण्यापूर्वी सर्व वैदिक होते. त्यामुळे हे बाहेरून आलेले मुसलमान नाहीत. म्हणूनच हिंदूंनी मुसलमानांना समजून घेणं आवश्यक आहे आणि मुसलमानांनीही हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेणं आवश्यक आहे,” असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. त्यावर रामदास आठवले म्हणाले, विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना अधिकार आहे. मात्र त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात फारसा फरक पडणार नाही. भारत राष्ट्र समिती पक्ष भाजपची ‘बी टीम’ नाही. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका आणि अधिकार आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे ‘बी टीम’ आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.