शासन आपल्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल? एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे अनेक जिल्ह्यांत आयोजन केल्या जातं. दरम्यान, विदर्भ दौऱ्यात शिंदे-फडणवीस सरकारवर याच योजनेवरून उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता. नुसतं दारी जाऊन काही उपयोग नाही. तर योजना त्यांच्या घरी पोहोचल्या का? हे पाहिलं पाहिजे, अशी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याचा शुभारंभ ठाण्यातून झाला आहे. याठिकाणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याला संबोधित केले. ते म्हणाले, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ठाणे हे आपल्या दिघे साहेबांचे राहणार. या ठाण्याने इतिहास घडवला आहे. काही लोकांना वाटतं आता कसं होणार? काय होणार? पण ठाणे हे शिवसेनेचेच राहणार आहे.

शासन तुमच्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल, अडीच वर्ष सत्ता असतांना हे बाहेरही पडले नाही आणि कोणती योजना राबवली नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले, लोक सत्तेत जातात पण मंत्रिपदावर असलेले लोक एकनाथ शिंदेंसोबत पायउतार झाले. मला कोणी विचारले नाही. सत्तेत बाहेर पडल्यावर का काय होईल, कसे होईल? जगाच्या इतिहासात असं उदाहरण कुठंही सापडणार नाही की जे लोक सत्तेत होते, मंत्रिपदावर होते त्यांनी राजीनामे दिले. सत्तेतून बाहेर पडतांना काय होणार, हे देखील माहित नव्हते. पण आम्ही लढायचे ठरवलं. एकतर लढू किंवा शहीद होऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही कलंक म्हणता? मला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि एकनाथ तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. याला मनाचा मोठेपणा लागतो. देवेंद्र फडणवीस यांना महापालिका घेता आली असती, पण त्यांनी ती घेतली नाही. याची परतफेड तुम्ही कशी केली? असा सवाल देखील यावेळी त्यांनी विचारला.पुढे बोलताना ते म्हणाले की, शासन आपल्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसे कळेल? आम्ही नोटा मोजण्याचा मशीन नाही घेत, पण आम्हाला शिलाई मशीन देण्याचा आंनद मोठा आहे. बाळासाहेब यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. “सत्तेचा अमरपट्टी कुणीही घेऊन आलेला नाही. जेव्हा आपल्याकडे काही अधिकार असतात, तेव्हा त्याचा वापर सर्वसामान्य लोकांच्या जीवनासाठी करा. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी करा, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.