महाराष्ट्रावर होणारे अत्याचार बघून या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी विचारला होता. त्याच प्रमाणे महाराष्ट्राची सद्य परिस्थिती बघता महिलांवर होणारे बघता, शेतकऱ्यांची अवस्था बघता, या सरकारचे डोके ठिकाणावर आहे ना ? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. असे म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झोपी गेलेल्या उद्धव सरकारला सुनावले. भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
“भारतीय जनता पक्ष हा संघर्षातून जन्माला आलेला पक्ष आहे. अत्याचाराविरोधात रस्त्यावर येऊन लढणारा, शेतकऱ्यांसाठी शेताच्या बांधावर जाऊन लढणारा पक्ष आहे. समाजासाठी लोकांमध्ये मिसळून काम करणारा पक्ष आहे. कोरोना काळातही समाजाचे उत्तरदायित्व घेऊन भाजपचे नेते कार्यकर्ते समाजासाठी रस्त्यावर उतरले आहेत. जनतेमध्ये कोविडमुळे भयावह वातावरण आहे, अशा अवस्थेत सत्तेत असलेल्यांना झोप कशी येते ?” असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भारतात कोव्हिडची सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्र कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यात पहिल्या क्रमांकावर आहे. आजपर्यंत सर्वात जास्त कोव्हिडचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत व ते कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अशा कोव्हिडच्या परिस्थितीत देखील महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या आहेत, आणि तरी सुद्धा महाराष्ट्राचं सरकार झोपलेलं आहे. यामुळे सामान्य माणसाची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, एम्ब्युलेंस वेळेवर येत नाही, आणि तरी देखील सरकारला याने काहीच फरक पडत नाहीये. म्हणूनच विरोधीपक्ष नेते यांनी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले.
