
महाराष्ट्रात असलेल्या आघाडी सरकार वर अनेक टीका होतात, मात्र जेव्हा टीका राज्याच्या राज्यपालांकडून येते, त्यावेळी त्याची दखल घेणं हे महत्वाचं असतं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी नाशिक दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात त्यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधत, सरकारला धारेवर धरलं आहे. महाराष्ट्रात आदिवासी भागात जर शाळेत शिक्षकांची पदं रिक्त असतील, गणित आणि इंग्रजी सारख्या विषयांसाठी सरकार जर चांगले शिक्षक उपलब्ध करुन देऊ शकत नसेल तर हे सरकार काय करतंय ? असा प्रश्न कोशियारी यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी कोशयारी म्हणाले ‘ मुंबई सारख्या महानगराजवळ पालघर आहे. परंतु तेथील आदिवासी बांधवांना पाहिले की सर्व मुंबईकरांनी त्यांचे रक्त शोषलेय की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते. शहरांपासून दूर आदिवासी भागात राहणाऱ्या या लोकांना वर्षांनुवर्षं पुढे जाण्याची संधीच मिळाली नाही.’ असंही ते यावेळी म्हणाले.
मला फॉरेस्ट वाल्यांची दया येते. त्यांच्या नावात रेस्ट असले तरी या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आराम नाही. वृक्ष तोडू नये म्हणून त्यांना पहारा द्यावा लागतो. चूल पेटविण्यापूरती लाकडे आदिवासी बांधव तोडणार असतील तर काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
झाडे उगवत असतील आणि माणसे मरणार असतील तर काय उपयोग, असे होत राहिले तर जंगलात माकडांचे राज्य येईल. वन कायद्यात सुधारणा होण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.
एकूणच राज्य सरकार वर त्यांचा रोष असल्याचा दिसून येतो आहे, मात्र राज्य सरकार याची दखल घेते का ? हे बघणं आता महत्वाचं ठरेल.
