मी बंद दरवाज्याआड कुठलेही काम करत नाही, मी वचन दिले नव्हते : अमित शाह

“हे म्हणतात की मी बंद दरवाज्याआड यांना (शिवसेनेला) वचन दिले होते. मी बंद दरवाज्या आज डुठलेही काम करत नाही. मी जनतेमध्ये जावून काम करणारा माणूस आहे, जे काही करतो छाती ठोक पणे करतो. मी शिवसेनेला कुठल्याही प्रकारचे वचन दिले नव्हते.” असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. कोकण येथील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.


ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची निवडणुक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह जितक्याही प्रचार सभा झाल्या, मोठ मोठे पोस्टर्स लागले त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सांगण्यात आले होते, त्यावेळी शिवसेना का गप्प होती?”


“त्यानंतर केवळ सत्तेसाठी लाचार असलेल्या शिवसेनेने आम्हाला बदनाम केले आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना तिलांजली देत तीन पायाची ऑटोरिक्शा सरकार स्थापन केले. आज हे तीन पायाचे सरकार वेगवेगळ्या दिशांना पळण्याच्या प्रयत्नात आहे, आणि म्हणूनच प्रत्येक आघाडीवर नापास ठरतंय. भारतीय जनता पक्ष सिद्धांतांसाठी राजकारण करतं, राजकारणासाठी सिद्धांतांना तिलांजली देत नाही.” अशाही भावना त्यांनी यावेळी मांडल्या.

यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधत टीकास्त्र सोडले, तसेच आम्ही लपून छपून काहीच करत नाही, जे करतो ते छाती ठोकपणे करतो, असे देखील म्हटले.