महाराष्ट्रातील पुन्हा येऊ घातलेल्या लॉकडाउन परिस्थितीला कोण जबाबदार ?


महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे केसेस वाढताएत. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारावर पोहोचली आहे आणि १०८ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे ? असा प्रश्न देखील इथे उद्भवला आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची व्हर्चुअल बैठक घेतली आहे, आणि अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत.

या आधी गेल्या शनिवारी कोरोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या १६३ होती जी गेल्या वर्षी म्हणजेच २०२० च्या ऑक्टोबर नंतर सगळ्यात अधिक आहे. अर्थात जेव्हा कोरोना पीक वर होता त्याच्याहूनही अधिक रुग्ण आणि मृतकांची संख्या आता बघायला मिळते आहे. त्यामुळे प्रशासनावर एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामध्ये नागरिकांचा हलगर्जीपणा तर आलाच मात्र प्रशासनाने देखील कोरोना सारख्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आपले संपूर्ण लक्ष्य दुसरीकडे लावले असल्याचे दिसून येते. (सचिन वाझे प्रकरण याचे एक छोटे उदाहरण म्हणता येईल कदाचित) त्यामुळे हे सरकार जनतेच्या हितासाठी सज्ज असलेले सरकार नाही का ? असे इथे दिसून येते.



महाराष्ट्रातील आकडे : 

28 मार्च- 40,414 नवीन केसेस

27 मार्च- 35,726 नवीन केसेस

26 मार्च- 36,902 नवीन केसेस

25 मार्च- 35,952 नवीन केसेस

24 मार्च- 31,855 नवीन केसेस

23 मार्च- 28,699 नवीन केसेस

22 मार्च- 24,645 नवीन केसेस

21 मार्च- 30,535 नवीन केसेस

ही परिस्थिती भयंकर आहे. अशा परिस्थिती मुख्यमंत्री स्वत: क्वारंटाइन होउन बसतात, गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे भयानक आरोप लागलेले असतात, आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकरात एक सुनामी आलेली असते. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने कुठे जायचे ? कुणाकडे बघायचे ? आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याच्या परिस्थितीत आहे. पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात उद्योगांवर आणि सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीवर याचा असर होणार आहे, मात्र याची जबाबदारी कोणाची ?

एक सामान्य माणूस म्हणून आपण देखील ही जबाबदारी घेतली पाहिजे. आपण देखील सोशल डिस्टेंसिंग पाळणे, कारण नसताता घराबाहेर न फिरणे, काम असल्यास योग्य ती काळजी घेणे, मास्क लावणे आणि गर्दी असलेल्या ठिकाणी न जाणे हे पाळले पाहिजे, एवढे आपण नक्कीच करू शकतो. मात्र त्याशिवाय सरकारने देखील प्रशासनाकडे लक्ष दिले पाहिजे. बार सुरु करून पैसे कमावण्यापेक्षा सामान्य माणसाला रुग्णालयात बेड्स मिळावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तर आणि तरच ही परिस्थिती हाताळली जाऊ शकते, अन्यथा महाराष्ट्राचे भविष्य धोक्यात आहे, आणि याहून मोठी शोकांतिका नाही.