अल्पसंख्यांकांवर उदार..! ठाकरे सरकार…!



महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून एकूणच राज्याचे वेगळेच चित्र समोर येत आहे. या चित्रात विकास जरा मागे आहे, इतर गोष्टींचा क्रमांक पहिल्या काही नंबरांवर दिसतो. त्यामध्ये अल्पसंख्यांकांसाठी उदारता ही देखील दिसून येते. मागे अजान स्पर्धा सुरु करण्यावरून जो काय गोंधळ झाला होता, त्यानंतरही ठाकरे सरकारने देखील इतर पक्षांप्रमाणे वोटबँकेचे राजकारण करण्याचे ठरविले आहे, असे दिसून येत आहे. नुकतेच ठाकरे सरकार कडून कब्रिस्तान आदिच्या बांधकामासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, ज्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे.

एकूणच इतर वेळी हिंदुत्व आपल्या नसांनसांमधून भिनले असल्याचा दावा ठाकरे करत असतात, मात्र तीन पायांच्या या सरकारचे तसे नाही, हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले, असे जी महाराष्ट्राची जनता म्हणते आहे, यात काही गैर नाही, असे आता वाटायला लागले आहे.

अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित विकासकामांसाठी निधी वितरीत करण्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. एकूण दहा कोटींपैकी चर्चकरिता केवळ दहा लाख तर जैन मंदिरांशी संबंधित विकासकामांसाठी २० लाख आहेत. संबंधित शासननिर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाकडून ग्रामीण क्षेत्र विकास योजनेसाठी ५७ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यापैकी दहा कोटी २२ लाख ९० हजार इतका निधी राज्यभरातील विविध ग्रामपंचायतींना अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित विकासकामांसाठी वितरीत करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अल्पसंख्याक विभागाच्या ग्रामीण क्षेत्र विकास योजनेंतर्गत आमदार, खासदार, राज्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव घेण्यात आले होते, असे राज्य सरकारने म्हटले आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील चर्चला संरक्षक भिंती व ‘पेव्हर ब्लॉक’ बसविणे, या कामासाठी देण्यात आलेले दहा लाख वगळता ख्रिस्ती अल्पसंख्याक समुदायासाठी अन्य कोणतीही मंजुरी देण्यात आलेली नाही. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधील नांदणी व निमशिरगाव तर सांगलीतील बुर्ली येथे जैन वस्तीतील रस्ते, गटार ‘काँक्रीटीकरण’, ‘पेव्हर ब्लॉक’ व डांबरीकरण अशा स्वरूपाच्या विकासकामांसाठी २० लाख निधीस मान्यता देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त काही रस्ते इत्यादी स्वरूपाची चार-पाच कामे वगळता इतर सर्व विकासकामे थेट मुस्लीम अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित आहेत.

हे सगळे बघता, एक गोष्ट लक्षात येते, कि शिवसेना देखील आता वोट बँकेच्या राजकारणाच्या शर्यतीत शिरली आहे. शिवसेनेची ओळख मानले जाणारे हिंदुत्व, हिंदु हृदय सम्राट या नावाने ओळखले जाणारे शिवसेनेचे रचयिते बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि त्यांची शिवसेना आता दिसत नाही. भाऊ तोरसेकर म्हणतात तसे ही राजपुत्राची युवासेना आहे, शिवसेना ही बाळासाहेबांसोबतच गेली. आणि हे मत केवळ एका व्यक्तिचे नव्हे तर संपूर्ण जतनेचे आहे. आणि ठाकरे सरकार या म्हणण्यावर आपल्या कामांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून येता जाता शिक्कामोर्तब करत आहे.