
राज्यात सध्या कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. गेल्या वर्षीहून अधिक कोरोनाचे पेशंट्स सध्या राज्यात आढळताएत. असे असताना राज्य सरकार कोरोनाच्या व्हॅक्सीन वरुन राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे. यावर टीका करत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “ राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनवर राजकारण कृपया करू नये, ही कळकळीची विनंती आहे.” राज्यात सुरु असलेल्या कारभारांविषयी आणि जनतेला होणाऱ्या गैरसोयी विषयी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले कि, “ राज्यात व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड उपलब्ध नाही! मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लस येत आहेत, येत राहतील. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी पुराव्यासकट माहिती देत, “महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय.” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
एकूणच सध्या राज्यात राज्य सरकारचा खेळ खंडोबा झालेला दिसतोय. राज्याचे महत्वाचे मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला, आणि उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात राज्याचे वाभाडे निघताएत. असे एकीकडे सुरु असताना, दूसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राने ज्या कळा सोसल्या नसतील, त्या सर्व यातना यावर्षी महाराष्ट्राला भोगाव्या लागत आहेत. असे असताना एका खंबीर नेतृत्वाची महाराष्ट्राला आवश्यकता आहे, एका स्थिर सरकारची जिचे लक्ष केवळ जनकल्याणावर असेल, भ्रष्टाचारावर नाही, अशा सरकारची आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याला खंबीर नेतृत्व देण्यात असमर्थ ठरले, असे स्पष्ट होत आहे. या संदर्भात आता पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
