कोरोना या महामारीमुळे आपण किती प्रतिभावान लोकांना मुकणार आहोत, हे तर परमेश्वरालाच ठाऊक. आज या महामारीमुळे अतिशय प्रतिभावान असे पत्रकार रोहित सरदाना यांचा मृत्यु झाला. ते केवळ ४२ वर्षाचे होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. रोहित सरदानाच्या जाण्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. एक निर्भीड पत्रकार एकाएकी निघून जातो, हे अतिशय भीषण, भयंकर आणि दु:खद आहे. ते कोरोना पॉजिटिव्ह होते, त्यानंतर आज त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, आणि त्यांचे निधन झाले.

रोहित हे आधी झीन्यूज मध्ये होते आणि ताल ठोक के हा त्यांचा प्रसिद्ध कार्यक्रम होता, त्यानंतर त्यांनी आजतक वाहिनी जॉइन केली, आणि इथे ते दंगल नावाचा शो होस्ट करायचे. आज संपूर्ण आजतक परिवार शोकाकुल आहे. आजतकने एक हीरा गमावला आहे. रोहित सरदाना यांना २०१८ मधअये गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रसिद्ध पत्रकार सुधीर चौधरी यांनी ट्वीट करून आज सकाळी या घटनेची माहिती दिली. ते लिहीतात, “थोड्यावेळा पूर्वीच माझे सहकारी जीतेंद्र शर्मा यांचा फोन आला, त्यांनी जी बातमी दिली त्यासाठी मी तयार नव्हतो, माझा मित्र, सहकारी, रोहित सरदाना याच्या मृत्युची ती बातमी होती. हा व्हायरस आपल्या इतक्या जवळच्या व्यक्तिला घेऊन जाईल याची मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. हा देवानी केलेला अन्याय आहे. ऊँ शांति..!”
एकूणच रोहित सरदाना यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विविध नेते मंडळी यांनी रोहित सरदाना यांना ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
