
महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा एक वादाचा मुद्दा आहे, त्यावरुन अनेक वाद सतत झालेले आहेत. याआधी भाजप सत्तेत असताना मोठ मोठे मराठा मोर्चे आणि त्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न हे सर्व आपल्या समोर आहेच, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यावर स्थगिती आणल्यानंतर याविषयी पुन्हा एकदा वाद सुरु झालो होते. आज या संदर्भातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली, तसेच या संदर्भात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.
राज्य सरकारच्या मतानुसार या आधीच्या सरकारने तयार केलेला कायदा हा ‘फुलप्रूफ’ नव्हता आणि म्हणूनच त्याला स्थगित करण्यात आले. यावर प्रतिउत्तर देत माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणतात कि, “मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा”
सोबतच ते पुढे असे ही म्हणतात कि, “मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते, आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
एकूणच या नव्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी गौडबंगाल असल्याचे समोर येत आहे. यातून मार्ग कधी निघणार, राज्य सरकार काय करणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
