
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक वर्ष गाजतोय. यासाठी फडणवीस सरकारच्या काळात मोठे मोर्चे आणि मूक आंदलोने झाली. या आंदलोनांमध्ये लाखो लोकांचा सहभाग देखील निदर्शनास आला, त्यानंतर फडणवीस सरकारने त्यावर तोडगा ही काढला, मात्र मुद्दा न्यायालयात रखडला गेला. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाचे वारे घुमू लागले आहेत. राज्यात १६ जून पासून कोल्हापुरात राजर्षि शाहू महाराजांच्या समाधीस्थळा पासून मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन करण्यात येत आहे.
या संदर्भात आज खासदार छत्रपति संभाजी राजे यांनी सांगतिले कि, “”उद्याचं आंदोलन हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटतं हा मोर्चा आहे. पण मूक आंदोलनाचा अर्थच आहे. आपल्याला मूक मोर्चा काढायचा असता तर, आपण काढू शकलो असतो. पण मोर्चा काढण्याची ही परिस्थिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा लोकांना आपण वेठीस धरायचंय का? ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून केल्या आहेत. समाज बोलला आहे, आणखी त्यानं रस्त्यावर का उतरायचं? आतापर्यंत समाजानं आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीही बोललं पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. उद्याच्या आंदोलनासाठी सर्वच आमदार, खासदारांना आपण निमंत्रित केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते सर्वजण येतील”
“आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपणही सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत. आपल्यापैकी कोणीही त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारायचे नाहीत. उद्या कोणीही बोलायचं नाही. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचं आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचं, त्यांचं मन मोकळं करु द्या. हवं तेवढा वेळ बोलू द्यात. पण त्यांनी येणं महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे ते सर्वजण येतील.”, असं देखील खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
“दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी संपर्क साधला. पोलिसांचाही समावेश होता. आम्ही त्यांना स्पष्ट केलंय की, हे मूक आंदोलन आहे. राज्यभरातील समन्वयक येणार आहेत. त्यामुळे त्यांची व्यवस्था करणं हीसुदधा आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही. कोरोना नियमांचं पालन करुन सोशल डिस्टन्सिंग ठेवून, अंतर ठेवून शांतपणे आंदोलन करु. कोणताही गदारोळ न करता. उद्या कोणताही गदारोळ होणार नाही, ही सावधगिरी आपण सर्वांनी पाळलं पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की, कोल्हापूरकरांनी नेहमी एक दिशा दिली आहे.”, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
एकूणच राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनं आणि मोर्च्यांची सुरुवात होत आहे, असे असताना राज्य सरकार या प्रश्नाला कुठल्या पद्धतीने हाताळते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
