सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे निधन म्हणजे भारताची झालेली एक अभूतपूर्व क्षति : फडणवीस

आज हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या झालेल्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अनेकांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत रावत यांची सेवा भारत कधीच विसरणार नाही असं म्हटलं आहे.



कुन्नूर येथे झालेल्या या अपघातात जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर 13 वीर जवान मृत्युमुखी पडले आहेत. देशासाठी झालेली ही खूप मोठी क्षति आहे. संपूर्ण देशभरातून जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि मृत्युमुखी पडलेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


याविषयी आपल्या भावना व्यक्त करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत कि, “भारताचे सेनानानयक सीडीएस जनरल बिपिन रावत आमच्यातून निघून गेले, ही आमच्यासाठी एक खूप मोठी क्षति आहे. जनरल बिपिन रावत यांनी अनेक संकटांच्या समयी भारतीय सेनेचं नेचृत्व केलं, सर्जिकल स्ट्राइक असो, एअर स्ट्राइक असो, उत्तर पूर्वेकडे आतंकवाद्यांविरोधातील ऑपरेशन्स असो, या प्रत्येका ऑपरेशनमध्ये त्यांचा प्रमुख सहभाग राहिला. आणि विशेषत: सिडीएस म्हणून आमच्या तीन्ही सेनांना एक नवीन स्वरूप देण्याचं काम जनरल बिपिन रावत यांनी केलं होतं. भोसला मिल्ट्री स्कूल मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्यासोबत मला संवाद साधण्याची संधी मिळाली होती, आणि अतिशय देशभक्त अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्यावेळेला त्यांच्या भाषणाने भोसला मिल्ट्री स्कूलचे सर्व विद्यार्थी प्रभावित झाले होते, आणि त्यांच्यात देशभक्तिचा ज्वार उफाळून आलेला मी बघितला आहे.

एक देशभक्त आणि आमच्या सेनेचे प्रमुख जनरल बिपिन रावत जी अचानक अशा प्रकारच्या अपघातात आमच्यातून निघून जातील असे कुणालाच वाटले नव्हते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि आमचे उम्दा ऑफसर्स आमच्यातून निघून गेले आहेत, मी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आणि विशेषत: जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी यांना श्रद्धांजली अर्पण करतो.” असे म्हणत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

देशाच्या इतिहासात घडलेली ही अतिशय भयंकर आणि मोठी घटना आहे, यामुळे झालेली क्षति भरून निघणार नाही, हे मात्र खरं.