राज्यात ओमिक्रॉनच्या नवीन ८ रुग्णांची भर…!

महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा कोव्हिडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आणि आता राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होते आहे. आज राज्यात ओमिक्रॉनचे ८ नवीन रुग्ण आले आहेत. दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 684 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 93  हजार 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.

राज्यात आज आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद :

राज्यात आज आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैक सात रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण वसई विरार येथील  आहे. आतापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 9 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

देशात कोव्हिडची तीसरी लाट येणार याविषयी चर्चा आधीपासूनच सुरु होती, मात्र आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. एकूणच पुन्हा एकदा लॉकडाउनची परिस्थिती येऊ नये यासाठी नागरिकांनी देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे.

राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 492 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 70 , 63, 688 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.