
सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात केला आहे. केवळ आणि केवळ सत्तेसाठी शिवसेनेने आपल्या विचारधारेशी देखील तडजोड केली. दोन पिढ्यांपासून हे लोक ज्यांच्या विरोधात उभे होते, आज त्यांच्याच मांडीत जाऊन बसले आहेत. असे कडक विधान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते.
यापुढे ते म्हणाले कि, “काही दिवसांपूर्वी मी एक विधान केले होते कि, महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे एक तीन चाकांची ऑटोरिक्षा आहे, आणि त्याची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशांना पळताएत, मात्र आता मी यात थोडा सुधार करतो, हे आघाडी सरकार तीन पायांची ऑटोरिक्शा आहे, मात्र ती पंक्चर झाली आहे, आणि ती चालत नसून केवळ धूर सोडून प्रदूषण पसरवते आहे.
कोरोना महामारी सुरु असताना ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार तळागाळात जाऊन जनतेची मदत करत होती, त्यावेळेला महाराष्ट्राची जनता महाराष्ट्र राज्य सरकारला शोधत होती.मात्र सरकार कुठेच दिसत नव्हते. अशी टीका देखील त्यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारवर केली.
या सभेत अमित शहा यांनी महाराष्ट्र राज्य सरकारवर सणकून टीका केली. गृहमंत्र्यांद्वारे अशी टीका येणे म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारसाठी ही एक लज्जास्पद बाब आहे, याचा राज्य सरकार किती विचार करते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
