
कोरोना काळ हा सर्वांसाठीच अतिशय भयंकर असा काळ होता, मात्र या काळात महाराष्ट्र शासनाने भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप आज विरोधी पक्षाकडून करण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या गटबैठकीनिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर सणकून टीका केली, ते म्हणाले कि, “ कोरोनाकाळात राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ही योजना सुरु करण्यात आली, मात्र त्यात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. आम्ही हे सर्व घोटाळे बाहेर काढू.
मोदी सरकारने दिलेले पैसे महा आघाडी सरकारने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले नाही :
“मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या नावे जे पैसे दिले आहेत, ते अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. राज्य सरकार रोज सकाळी उठून खोटे बोलते कि केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत, मात्र हे सत्य नाहीये, याचा देखील आम्ही पर्दाफाश करणार आहोत.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
कुलगुरूंचे अधिकार कमी करणारा कायद्याला आम्ही कडाडून विरोध करू. विद्यापीठ ताब्यात घेणारा कायदा देशात कोणत्याही राज्याने केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकूणच सराकर आणि विरोधीपक्षात खडाजंगी सुरु आहे, त्यातून पुढे काय होतं, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
