
आज राज्याचा बारावीचा निकाल लागलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांना आज दिलासा मिळाला आहे. आता विद्यार्थ्यांची नजर दहावीच्या निकालाकडे लागलेली आहे. दहावीचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. आज अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
एकूणच या वर्षीच्या परीक्षा वेगळ्या होत्या. त्याचे कारण म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या भितीमुळे ऑनलाइन परीक्षा होत होत्या, मात्र या वर्षी ऑफलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देणं म्हणजे एक खूप मोठं चॅलेंज होतं. एकूणच शिक्षण आणि अभ्यास पद्धत गेल्या दोन वर्षात बदलली आहे. आणि त्यामुळेच या वर्षीचे निकाल अधिक खास होते.
राज्यातील विनाअुनदानीत शाळांच्या शिक्षकांनी या आधी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं. आता त्या प्रमाणे बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्याच्या काळात दहावीचाही निकाल लागण्याची अपेक्षा आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1534478391310954496/photo/1
शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बारावीचा निकाल लागण्यासाठी उशीर झाला. बारावीच्या निकालानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे.
यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु होती. तर दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी 3 ते 6.30 अशी होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
