हे तर होणारच होते…! कर्माची फळं…! नेमकी कुणाची हाय लागली ?


गेल्या २.५ वर्षात महाराष्ट्राने एक अतिशय वाईट काळ बघितला आहे. एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती गेल्या २.५ वर्षात अतिशय केविलवाणी अशी झाली होती. त्याचे एकमेव कारण म्हणजे अकार्यक्षम, नेतृत्व गुण नसलेला, विजन नसलेला मुख्यमंत्री आणि त्यासोबत त्यांचे मग्रुर साथीदार. सत्तेची नशा डोक्यात गेल्यावर त्याचे परिणाम काय होतात, ते आपण गेल्या काही दिवसात बघितले आहे. गेल्या २.५ वर्षात महाराष्ट्रात अनेक घटना घडून गेल्या. त्यात खरं तर प्रशासनिक स्तरावर खूप काही करता आलं असतं, मात्र ते करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकूणच महाराष्ट्राचे मविआ सरकार संपूर्णपणे फेल ठरले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुरुवात झाली कोरोना पासून. स्वत:ला कोरोना काळातील ‘बेस्ट सीएम’ सांगणारे मुख्यमंत्री यांनी स्वचिंतन केले पाहिजे, स्वावलोकन केले पाहिजे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात प्रशासनिक स्तरावर काहीच व्यवस्था नव्हती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: एकही टास्कफोर्स उभारून ती लीड केली नाही. त्यांनी महत्वाच्या योजना आखल्या नाहीत, त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न तर दूरच राहीला.

एकूणच कोरोना काळात जिथे मुख्यमंत्र्यांना आणि मविआ सरकारला स्वत:ला सिद्ध करण्याची एक मोठी संधी होती, तिथे हे सरकार अयशस्वी ठरले. यावेळी प्रत्येकाच्या अनेक ओळखीच्या लोकांना या काळात प्रशासनाचे अतिशय वाईट अनुभव आले आहेत. मुंबईतील एका परिवाराला कोरोनाची लागण झाली होती. परिवारातील मुलगी स्वत: जर्मनीत होती जिने या बद्दल माहिती दिली. मात्र इथे मुंबईत तिचे आई, वडील आणि भाऊ होते, तिघेही एसिम्टोमेटिक होते. खरं तर त्यांना होम क्वारंटाइन होऊन व्यवस्थित उपचार करून बरं होता आलं असतं, मात्र चीनच्या हुकुमशाही प्रमाणे त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यात आलं, तिथे त्यांने खरोखरीच हाल होत होते, अस्वच्छता शिगेला पोहोचली होती. लक्ष देणारे कोणी नव्हते. अशा वेळी धाऊन आले, ते विरोधीपक्ष नेते आणि आता भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी अशा एक नाही अनेक परिवारांची, लोकांची मदत त्यांच्या टीमच्या मदतीने त्वरित केली.

हा कुणा एकाचा वैयक्तिक अनुभव आहे, मात्र असे अनेक अनुभव केवळ कुणा एका ओळखीच्या व्यक्तीलाच नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाला त्याकाळात आले आहेत. स्वत: घरात कोंडून बसून, फेसबुक लाईव्ह वरुन कोमट पाणी पिण्याचे सल्ले देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अशा काळात पहिल्या ५ सीएम मध्ये कोणी कसं धरू शकतं? अशा परिस्थितीत पाणी नाका तोंडात जाऊन सुद्धा त्यावेळी हे सरकार जागे झाले नाही, हे त्यांचे पहिले कर्म होते, ज्याचे फळ त्यांना भोगावे लागणारच होते.

त्यानंतर सत्तेची मग्रुरी वाढत होती. कंगना रणौत या अभिनेत्रीचं घर बळजब्रीने काहीतरी थातुर मातुर कारण काढून यांनी पाडलं, कारण एकच ही अभिनेत्री खुल्या पद्धतीने सरकारचा विरोध करत होती. ती त्याच वेळेला म्हणाली होती, “आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा” आणि काल नेमकं तेच झालं. त्यावेळी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून सरकारची मग्रुरी जगासमोर येत होती, मात्र सरकार शाहणे झाले नाही, संजय राऊतांचे अतिशय खालच्या थराचे वक्तव्य, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची मग्रुरी जनतेच्या संयमाची परीक्षा बघत होती. त्यांच्या या ‘कुकर्मांच्या’ यादीत आणखी एक कर्म जोडले गेले होते.

या सगळ्यात, अतिशय भयंकर घटना पालघर येथे घडली, दोन साधुंना पोलिसांनी अक्षरश: जमावाच्या हवाले केलं. त्यांचा ठेचून ठेचून मारण्यात आलं. हे सगळं घडत होतं, शिवसेनेच्या राज्यात. तीच शिवसेना ज्यामध्ये धर्मवीर आनंद दिघेंसारखे नेते होते, ज्यांनी हिंदुंच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावण्यासही मागे पुढे बघितले नाही. तीच शिवसेना जी दंगलींच्या काळात हिंदुंच्या रक्षणासाठी सगळ्यात पुढे होती. आणि हे सगळं झाल्यानंतर मुख्यमंत्री ऑनलाइन येऊन सांगतात, या घटनेला धार्मिक रंग देऊ नका ? या घटनेतील आरोपी, मास्टरमाइंड दोन दिवसाच्या आत सुटले आणि आज आपली  ‘खुशहाल जिंदगी’ जगताएत. या साधुंचे श्राप स्वत:वर ठाकरेंनी ओढवून घेतले, आणि त्याचे परिणाम आज ते भोगताएत.

अर्णब गोस्वामी सोबत केलेली वर्तवणूक कोणी कसं विसरू शकेल ? पत्रकार अर्णब गोस्वामीचा केवळ या कारणाने मानसिक छळ करण्यात आला कारण त्याने त्याच्या पत्रकारितेचा वापर या सरकारचे खरे रूप दाखवण्यासाठी केला. आपण लोकशाहीची पूजा करतो, आणि त्या लोकशाहीत हे असं होत होतं. सरकार त्याच्या अध:पतनाचा रस्ता स्वत: तयार करत होते. अर्णब गोस्वामीचा छळ सर्व माध्यमांनी दाखवला. आणि त्यामुळे या सरकारप्रति सामान्य माणसाचे मत आणखीनच खराब होत गेले.

त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात आणखी एक भयंकर घटना घडली ती म्हणजे मनसुख हिरेन, एंटालिया, अनिल देशमुख, सचिन वाझे आणि पमबीर सिंह प्रकरण. १०० कोटींचा भ्रष्टाचार (कदाचित त्याहूनही जास्त असेल). एका माणसाचा खून होतो, इतकं मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर येतं. आणि त्यासाठी जबाबदार कोण तर स्वत: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ? अशा अंधेर नगरी चौपट राजाचं पुढे होणार तरी काय ? ते म्हणतात ना सरकारने “खुद की कब्र खुद ही खोद ली”.

नंतर मंत्री नवाब मलिकांचे दाऊदसोबत असलेले संबंध समोर येणं. तो दाऊद ज्याच्या हातावर मुंबईचे रक्त लागले आहे. त्यातून नवाब मलिकला सरकारचा पाठींबा मिळणं हे सर्व अतिशय भयंकर होतं.

आता मला सांगा, या सगळ्यात सामान्य माणसाचे प्रश्न कुठे आहेत ? सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळालीत का ? एसटी कर्मचारी जेव्हा आत्महत्या करत होते, तेव्हा हे माननीय मुख्यमंत्री ‘द बेस्ट सीएम’ कुठे होते ? अडीच वर्ष घरात बसून, वर्क फ्रॉम होम करत, ऑनलाइन काम करत एक मुख्यमंत्री राज्य कसं काय चालवू शकतो? ते जनतेत उतरले का ? त्यांनी राज्याचे दौरे केले का ? आता मी जनतेसाठी त्याग करतोय असा आविर्भाव दाखवणारे मुख्यमंत्री जेव्हा खरंच काम करायची वेळ होती, तेव्हा कुठे गेले होते ? काय करत होते ?

या सगळ्यात माज कमी होईल तर शप्पत. तुम्ही संजय राऊतांचे प्रत्येक वक्तव्य ऐका. त्याला मग्रुरीचा एक घाण वास येतो. असं सगळं असताना ज्या काळात महाराष्ट्राला खरंच एका कार्यक्षम, दूरदृष्टी असणाऱ्या, नेतृत्व गुण असणाऱ्या, निर्णय क्षमता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची गरज होती, तेव्हा उद्धव ठाकरे, सर्व समस्यांमधून पळ काढत घरात लपून बसले होते. आणि हे सत्य आता कुणीच बदलू शकत नाही.

नेमकी कुणाची हाय लागली? पालघर साधुंची? अर्णब गोस्वामीची? दाऊदच्या दहशतवादी कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवारांची? मनसुख हिरेनच्या परिवाराची? शेतकऱ्यांची? सुशांत सिंह राजपूतची? कंगना रणौत ची? एसटी कर्मचाऱ्यांची? कि संपूर्ण महाराष्ट्राची ?

हे सरकार जनतेचा कौल मिळालेले सरकार कधीच नव्हते, जनतेवर बळजबरीने लादलेले सरकार होते. आणि स्वार्थाने मिळवलेली सत्ता कधीच टिकत नसते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.

आता महाराष्ट्रात विकासाचे एक नवीन पर्व सुरु होणार आहे, महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आता सुटले आहे. आता महाराष्ट्र एक मोकळा श्वास घेणार, आणि ज्यांच्या सोबत छळ झाला, ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थाने शांतता लाभणार.

जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र

– एक सामान्य नागरिक