महाराष्ट्रात आता हवा बदलताना दिसतेय. सत्तेचे नवीन वारे वाहताना दिसत आहेत. एका मोठ्या वादळाची ही चाहूल आहे का ? आणि अखेर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल मान्य होत आहे का ? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राची सद्य स्थिती पाहता सामान्य माणसाच्या मनात उपस्थित होत आहेत. आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अतिशय महत्वाची अशी बैठक होणार आहे. तर तिथे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात देखील बोलणे सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी बसवण्यात आली आहे, आणि एकूणच शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली आहे. असे असताना महाराष्ट्रात या ‘संगीत खुर्ची’त विजय कोणाचा होतो हे बघणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

एकूणच महाराष्ट्राच्या सद्य राजकीय परिस्थितीचे आकलन करता एक मात्र लक्षात आले आहे कि, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता या विचित्र राजकारणाच्या कचाट्यात सापडले आहेत. एक मुख्यमंत्री म्हणून आपली योग्यता सिद्ध करण्यास ते असमर्थ झाले आहेत, आणि इतर कुणी नव्हे तर त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदारांना त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेले लगट आणि त्यांना दिलेले महत्व, सोडलेले हिंदुत्व आणि डावललेले आपलेच लोक सहन झाले नाहीत., आणि त्यातून हे संकट उद्भवले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करता आता पर्यंत अनेक ज्येष्ठ राजकीय अभ्यासकांनी सिद्ध केले होते, आणि वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता कि हे तीन पायांचे लंगडे सरकार आंतरविरोधातूनच तुटेल, हे तोडण्यासाठी कुण्या तिसऱ्या पक्षाची आवश्यकता पडणार नाही. त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे, सरकार जरी उद्धव ठाकरेंच्या नावाचे असले तरी त्यात मोठा प्रभाव शरद पवार यांचा आहे. पवार आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद आणि आदित्य ठाकरे यांचे करियर याचे चॉकलेट देऊन सरकार स्थापन केले, मात्र त्यामागे मोठे राजकारण असल्याचे मुख्यमंत्रांना कळले नाही, असे आता तरी वाटते. सत्ता मिळण्याची मग्रुरी सतत या न त्या कारणाने बाहेर येत होती.
मग ते अर्णब गोस्वामी सोबत केलेला अत्याचार (हॅरेसमेंट) असू देत, नाही तर कंगना रणौतचा पाडलेला बंगला. “मेरा आज घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा.” असे कधीच ती कंगना सांगून बसली होती, मात्र ठाकरे सरकारने या कशालाच गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर पालघर येथे साधुंचे मॉब लिंचींग झाले, आणि हिंदुत्व जपणाऱ्या शिवसेनेच्या एकूणच प्रतिमेवर भला मोठा काळा डाग लागला, मात्र तो पुसण्याचा साधा प्रयत्न सुद्धा ठाकरे सरकारने केला नाही. मनसुख हिरेन आणि एंटालिया प्रकरणावरुन या सरकारचा अतिशय ओंगळ असा बटबटीत भ्रष्टाचाराचा चेहरा जगासमोर आला. आणि त्यानंतर दाऊदसोबत सरकारमध्ये असलेल्या नवाब मलिक यांच्या संबंधातून तर या सरकारने पार निर्लज्जपणाचा कळसच गाठला. सामान्य माणसाला वेठीस धरून हे सरकार आपलेच खरे करण्याचा प्रयत्नात आहे, हे दिसून आले. मुंबईला रक्ताने माखवणाऱ्या दाऊदसोबत नवाब मलिकांचे व्यवहार होतात, आणि सरकार त्यांचा राजीनामा घेणे तर दूर उलट त्यांना पाठीशी घालते, जेल मध्ये असून सुद्धा त्यांचे मंत्रीपद जात नाही? असे कसे ?
नेमकी कुणाची हाय लागली हे शोधणं जरा कठीण आहे, कारण सुशांत सिंग राजपूत पासून ते सामान्य शेतकऱ्या पर्यंत सगळ्यांनीच या सरकारचा वीभत्स चेहरा बघितला आहे. आणि त्याचेच परिणाम म्हणजे आज हे सरकार राहील का जाईल या स्थितीत येऊन पोहोचले आहे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिंदुत्वाच्या नावाने जाणली जाणारी शिवसेना आज पार रसातळाला पोहोचली आहे.
आता प्रश्न हा उपस्थित होतो, कि महाराष्ट्रात सुरु असलेल्या ‘खेल कुर्सी का’ मध्ये नेमकं विजयी कोण होतं ?
