पुणे :पाकिस्तान जिंदाबादची घोषणा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कोणी जर देणार असेल तर त्याला सोडणार नाही. कुठे असेल तेथून शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

देशभरातील 11 राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया( पीएफआय) या संघटनेच्या कार्यलायांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापे टाकले. देशविरोधी कट केल्याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली. याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेने आंदोलन केले. यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा घोषणा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कोणी जर देणार असेल तर त्याला सोडणार नाही. कुठे असेल तेथून शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
कुठलीही परवानगी नसताना हे आंदोलन केले गेले. यात शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर भादवी 141 143 145 147 149188341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती बंडगार्डनचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली.
