मुंबई : कै. गाेपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यात रेल्वेचे स्वप्न पाहिले हाेते. बीड लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात खुद्द पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी हे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले हाेते. महाराष्ट्रात 2014 ला सत्तांतर झाले व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रकल्पाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्रीपदाच्या काळात दर तीन महिन्यांनी त्यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला.

या रेल्वेमार्गासाठी दोन हजार ८२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या अंदाजित खर्चापैकी १४१३ कोटी रुपये म्हणजे ५० टक्के खर्चाचा हिस्सा उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारने ३१ मार्च, २०२०पर्यंत १३९८.१२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. फडणवीस सरकारनेही ११६९.८४ कोटी रु. इतका निधी शासन निर्णयान्वये रेल्वेस उपलब्ध करून दिला. त्यामुळे या मार्गाचे काम पुढे सरकले.

१९९७ साली हा मार्ग मंजूर झाला. परंतु, तत्कालीन सरकारांनी यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे फडणवीस सरकारने निधी देण्याचा धाेरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळे नंतर काही काळासाठी आलेल्या महाविकास आघाडी सरकारलाही निधी देणे भाग पडले. गोपीनाथ मुंडे यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी सुद्धा दिल्लीत सतत पाठपुरावा सुरूच ठेवला होता. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर २२ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने त्यांच्या वाट्याचे 150 कोटी वितरीत केले.

लाेकार्पण साेहळ्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, दीर्घ संघर्षानंतर अहमदनगर-आष्टी रेल्वे धावत आहे. मुंडे यांनी बीड येथे रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. आज पहिल्या टप्प्यात न्यू आष्टी – अहमदनगर डेमू आणि रेल्वे मार्गाचे उदघाटन झाले. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आपण मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचा दर तीन महिन्याला आढावा घेत होतो. यासाठी आवश्यक तो भरीव निधी केंद्र व राज्य शासनाने दिला. राज्याचा भागीदारी हिस्सा सुरू करण्याचा निर्णयही या शासनाने घेतला.


बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. हे आश्वासन आज पूर्ण झाल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
