पालघर हत्याकांडाचे प्रकरण आता सीबीआयच्या हातात..!

पालघर साधू हत्याकांड प्रकरण कोणीच कधीच विसरू शकत नाही. अतिशय निर्मम पद्धतीने दगडांनी ठेचून ठेचून पालघर येथे दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची हत्या करण्यात आली होती. त्याविषयी राज्य सरकारने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हे प्रकरण सीबीआय कडे सोपविण्याचे ठरविले आहे. हत्याकांड प्रकरणाच्या सीबीआय तपासाला आपली हरकत नसल्याची माहिती गृहविभागाकडून देण्यात आली असून त्याबाबत शपथपत्र देखील देण्यात आले आहे.


पालघर भागात घडलेल्या या घटनेत सुरतकडे जाणाऱ्या २ साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची गडचिंचले येथे जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकरणानंतर तत्कालीन ठाकरे सरकारच्या विरोधात मोठा आक्रोश राज्यभरात निर्माण झाला होता. या प्रकरणी २०० पेक्षा अधिक लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्यातील काही आरोपींना न्यायालयाकडून जामीन देखील मंजूर करण्यात आला होता. 

पालघर येथे झालेल्या या साधू हत्याकांड प्रकरणात तत्कालीन राज्यसरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तसेच या घटनेला ‘धर्माचा रंग’ देऊ नयेअसे आवाहन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र त्यावर संपूर्ण माहाराष्ट्रातून टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र आता हे प्रकरण सीबीआयकडे गेल्याने मात्र महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळाला आहे.