टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावरून जोरदार राजकीय धुळवड चालू असताना, टाटा सन्सच्या अध्यक्षांनी लवकरच महाराष्ट्रत मोठी गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील नागपूरमधील मिहान मध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात टाटा सन्सची गुंतवणूक गेल्यामुळे फडणवीस – शिंदे सरकारवर जोरदार टीका करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना जोरदार चपराक बसली आहे.

नागपुरातील मिहानमधील सेझ प्रकल्पात ही गुंतवणूक होणार आहे. मिहान मधील गुंतवणुकीसाठी विदर्भ विदर्भ इकोनॉमिक डेव्हलपमेंट काऊंसिल म्हणजेच वेदने एक आराखडा तयार केला आहे.यात मिहान मध्ये गुंतवणुकीसाठी असलेल्या संधीबद्दल सांगण्यात आले होते. चंद्रशेखर यांनी पाठवलेल्या पत्रात त्यांनी या नवीन गुंतवणुकीसंदर्भात वेदच्या संपर्कात राहू असे सांगितले आहे. टाटा समूहाचे अनेक प्रकल्प नागपूरमधील मिहान येथे आहेत, त्या प्रकल्प विस्तारासाठी अनेक संधी उपलब्ध असल्याने या कंपन्यांच्या विस्ताराच्या अनुषंगाने मोठी संधी उपलब्ध आहे असे चंद्रशेखर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रात सत्तापालट होताच राज्यातील गुंतवणुकीसाठी बिघडलेले वातावरण बदलण्यासाठी राज्यातील फडणवीस – शिंदे सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. याचे सकारात्मक पडसाद भांडवली बाजारात दिसत आहेत. मागील सहा सत्रांमध्ये विदेशी वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल १ अब्ज कोटी डॉर्लसची गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचा असाच ओघ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
