कार्तिकी वारीसाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. मोठ्या प्रमाणात भाविक याठिकाणी आले आहेत. विठ्ठलाला माझे एकच मागणे आहे, कि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि संपन्न व्हावा. असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच जनता आमच्या पाठीशी आहे, आम्ही जनतेसाठी काम करत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले. आज पंढरपूर येथे कार्तिकी वारीला ते उपस्थित झाले असताना माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी विरोधकांबद्दल प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले कि, आम्हाला सतत पाण्यात पाहणारे, आमच्या विरुद्ध विचारधारा एकसारखी नसतानाही एकत्र येणारे नेहमीच एकत्र येतात, आणि त्यामुळे आमच्या कामावर काही असत होत नाही, आम्ही जनतेसाठी काम करतो आणि जनता आमच्या पाठीशी आहे.
तसेच वारीला येणाऱ्या भाविकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागते यासाठी सरकार ‘तिरुपती पॅटर्न’च्या आधारावर काही करणार आहे का ? असा प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी सांगितले कि, “प्रत्येक स्थानाची भौगोलिक स्थिती आणि गरजा वेगळ्या असतात, आपण आपल्या भाविकांना सोयीचे काय होईल यासाठी काम करू. तिरूपती पॅटर्न देखील अनेक वर्षात अनेकदा बदलला आहे, आणि तिथल्या भौगोलिक स्थिती आणि गरजांनुसार त्याची रचना करण्यात आली आहे, त्याच प्रमाणे आपल्या वारीला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या गरजांनुसार आपण व्यवस्थांची रचना करू आणि यावर काम करण्यात येईल.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
