“राजकारणात जेव्हा आपला मित्र आपल्या पाठीत खंजीर खुपसतो, त्यावेळी आपल्याला जीवंत राहून तो त्याला परत करावा लागतो. नाहीतर तुम्हाला राजकारणात जगता येत नाही. आणि मी तेच केलं. होय, मी बदला घेतला आणि याचा मला अभिमानच आहे.” असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. साम टीव्ही या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“राजकारणात आपण चांगलंच राहिलं पाहिजे, मात्र आपल्या चांगुलपणाचा जर कुणी फायदा उचलत असेल, आणि आपल्या सोबत बेईमानी करत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. आणि ती जागा मी दाखवली याचा मला अभिमान आहे. माझ्या सोबत जर तुम्ही बेईमानी कराल तर त्याचा बदलाच घेईन मी. होय मी बदला घेतला.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
अतिशय खणखणीत पद्धतीने फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना आणि शिवसेनेला खडेबोल सुनावले. २०१९ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर महाराष्ट्रात जे काही राजकीय नाट्य घटले, ज्या प्रकारे मी पुन्हा येईन यावरुन फडणवीस यांना सुनवण्यात आले, त्यानंतर महाराष्ट्रात हे सरकार कधी पडणार, ते कोण पाडणार याकडेच जनतेचे आणि राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले होते. अखेर जूनमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली, सरकार पडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले आणि फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आले.
एकूणच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय नाट्य घडले. यावरुन फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आज वरील स्पष्ट आणि खणखणीत उत्तर देत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
