वाचाळवीरांना आवरा, संस्कृती जपा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई : तुमच्या पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढतेय.वाचाळवीरांना आवरा, संस्कृती जपा, असे आवाहन आपण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


मुंबईत पत्रकार परिषदेत बाेलताना अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, तुम्ही सामान्य नागरिक नाही, लोकप्रतिनिधी आहात. पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आपल्या सहकाऱ्यांच चुकत असेल तर त्यांना समज देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या दोघांचेही हे काम आहे.

पवार म्हणाले, सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात. आमच्यावर दबाव असल्याचं ते बोलून दाखवतात. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बोलणे गरजेचे आहे. हे लोकशाहीला शोभणारे नाही. मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी प्रचंड तणावाखाली आहेत. सरकार आल्यापासून प्रशासना मध्ये म्हणावं तस काम होत नाही. आधी दोघेच काम करत होते. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर काही जण मंत्री झाले

शिर्डी येथील अधिवेशनातील अनुपस्थितीबाबत पवार म्हणाले,  त्या दरम्यान मी बाहेर होतो. मी माध्यमांच्या समोर आलो नाही तर अनेक बातम्या येत होत्या. पण सार्वजनिक आयुष्यात गोष्टी लपवून ठेवता येत नाहीत.

किती जणांना वाय+ दर्जाची सुरक्षा आहे याबाबत आपण आरटीआय टाकल्याचे सांगताना पवार म्हणाले, ताफ्यात 25-30 गाड्या असतात. हा जनतेचा पैसे आहे, याचे भान राखले पाहिजे.  काही माजी नगरसेवकांना दाेान पोलीस दिमतीला कशाला?

राज्यात कारखानदारी येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगताना पवार म्हणाले, काही वरीष्ठ लोक उद्योगपतींना इतर राज्यात जाण्यास सांगतात. राज्यपाल,  वरिष्ठ पातळीवरील व्यक्तींनी असे करू नये. आम्ही काय चुकलो ते सांगा. पण, तुमच्या नाकर्तेपणामुळे काही प्रकल्प बाहेर गेलेत ते सुद्धा सांगा

आनंदाचा शिधा हा मनस्तापाचा शिधा झाला आहे. याबाबत माहिती मागवली आहे. यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या संशयला जागा आहे, असा आराेपही अजित पवार यांनी केला.