जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी अमान्य केली आहे. त्यामुळे आता मंदाकिनी खडसे विरुध्द मंगेश चव्हाण अशी लढत रंगणार आहे.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी व संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर तालुक्यातूनच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चव्हाण यांच्य अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली घेवून औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होत.
ज्या तालुक्याचा मतदार आहे, त्याच तालुक्यात त्यांना उमेदवारी दाखल करता येते. मात्र आमदार चव्हाण यांनी या नियमाचे उल्लघंन केले आहे, ते चाळीसगाव तालूक्यात सभासद आहेत, मात्र त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल केल आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी त्यांनी खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत केली होती. याचिकेवर आज सुनावणी झाली, न्यायधीश संदीप मारणे यांनी मंदाकिनी खडसे यांची याचिका फेटाळून लावली आहे. तर आमदार चव्हाण यांची उमेदवारी मुक्ताईनगरातून ग्राह्य ठरविली आहे. त्यामुळे खडसे यांना मोठा झटका बसला आहे.
न्यायदेवतेने आपल्याला न्याय दिला आहे. जिल्हा दूध संघात इतर गटातून सर्व उमेदवारांनी माघार घेतली व त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली तरी आपण मात्र मुक्ताईनगरातून माघार घेणार नाही,आपण या मतदार संघातून उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढणार आहोत, असे चव्हाण यांनी सांगितले.
