पुणे : वीर सावरकर यांच्या तथाकथित माफीनाम्यावरून सध्य गदाराेळ उडाला आहे. काॅंग्रेस सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील याेगदानच नाकारण्याचा प्रयत्न करत हाेते. त्याला अनेक पुराेगामीही साथ देत आहेत. पण पुराेगाम्यांचे शिराेमणी नरहर कुरुंदकर आणि ज्येष्ठ संशाेधक य. दि. फडके यांनी सावरकरांबद्दल काय म्हटले हाेते पाहायला हवे. सावरकरांचा माफीनामा (?) म्हणजे इंग्रजांना दाखविलेले आमिष हाेते असे य. दि. फडके यांनी म्हटले आहे.

य. दि. फडके यांनी आपल्या ‘शाेध सावकरांचा’ या ग्रंथात म्हटले आहे की, पन्नास वर्षे अंदमानच्या कोठडीत राहून जीवित यात्रा संपवण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन सशर्त व बिनशर्त मुक्त होण्यासाठी सावरकर अंदमानातून प्रयत्न करीत होते. म्हणूनच सुटकेला उपकारक परिस्थिती निर्माण झाली आहे असे त्यांना वाटले की ते सुटकेसाठी अर्ज करीत. या व्यवहारिक धोरणाला यश यावे म्हणून ते सरकारला अनेक आश्वासने देत असत आणि सहकार्याचे आमिष दाखवीत असत. १९३७ पर्यंत हा खेळ ते खेळत होते.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर सावरकरांना ‘सशस्त्र क्रांतीचे महान योजक’ म्हणतात. क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली. ‘देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले, असे ते म्हणतात.
