मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चार ते सहा जानेवारी दरम्यान मुंबईतील वरळी येथील क्रीडा संकुलात विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे बुधवारी (दि.4) सकाळी 11.00 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. इतक्या भव्य पातळीवर मराठी संस्कृतीचा उत्सव साजरा करणार हे संमेलन प्रथमच होत आहे. जगभरातील मराठी भाषकांनी एकत्र यावे मराठीची गोडी वाढावी मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मराठी भाषा, संस्कृती, कला, साहित्य, उद्योग आणि पाककृती अशा विविध पैलूंना स्पर्श करणारे पहिले विश्व मराठी संमेलन आजपासून मुंबईत होत आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.तसेच या संमेलनात महाराष्ट्र बाहेरून आणि देशाबाहेरून मराठी वर प्रेम करणारे अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य, उद्योग, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींची उपस्थिती राहणार आहे.
संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन : संमेलनाच्या तीनही दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला आहे पहिल्या दिवशी चार जानेवारी रोजी लेझीम पथक ढोल ताशा पथक मर्दानी खेळ यांच्या साथीने मोठ्या जल्लोषात संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर निमंत्रितांचे स्वागत मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या सत्रात नचिकेत देसाई, केतकी भावे, जोशी माधुरी, करमरकर मंगेश बोरगावकर, श्रीरंग भावे हे गायक कलाकार काही अजरामर मराठी गाणी सादर करतील. त्यानंतर रंग कलेचे हा वंदना गुप्ते, निना कुलकर्णी, शिवाजी साटम, अशोक पत्की अशा सिने नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहे. तसेच लेखिका संजीवनी खेर, प्रकाशक हर्ष भटकळ, लेखक ऋषिकेश गुप्ते या साहित्यिकांच्या सहभागात मराठी भाषा काल आज उद्या हा परिसंवाद राहणार आहे. उपसभापती नीलम गोरे या परिसंवादाच्या अध्यक्ष असतील तर श्रेया बुगडे संचालन करणार आहेत.
संमेलनात नामवंतांचा सहभाग : या संमेलनात विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा मराठमोळा फॅशन शो होणार आहे यात लेखिका पटकथाकार मनीषा कोरडे भाषा तज्ञ अमृता जोशी झी स्टुडिओच्या वैष्णवी कानविंदे, क्रीडा प्रशिक्षक नीता ताटके, दिग्दर्शिका समृद्धी पोरे, लँडस्केप डिझायनर असीन गोकर्ण, एडवोकेट दिव्या चव्हाण, व्यावसायिक सुप्रिया बडवे, चित्रकार शुभांगी सामंत अशा महिलांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री संविधान गुरु करणार आहे. मराठी भावगीत, भक्ती गीत, नाट्य संगीत यांची मैफल या कार्यक्रमात असणार आहे. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, अशा खाडीलकर, उत्तरा केळकर यांच्यासह उर्मिला धनगर, वैशाली माडे आदी कलावंत सहभागी होणार आहेत.
तिसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायाचे दर्शन घडवणारी दिंडी काढण्यात येईल. लोककलांचे सादरीकरण करण्यात येईलं. जगभरातून आलेल्या उद्योगपतींची उद्योगमंत्री उदय सामंत हे मुलाखत घेतील.
