मुंबई: छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे वक्तव्य विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाकडून आंदाेलन हाेत आहे. गेल्या दाेन दिवसांपासून अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांतून गायब आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या मदतीला शरद पवार धावून आले आहेत. धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षक, ज्याची जी आस्था असेल त्याने ते म्हणावे, पण या वादावर पडदा टाकावा, असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. यामुळे स्वतः अजित पवार हे दोन दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे शरद पवार हे त्यांच्या मदतीला आले आहेत.
शरद पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा. मला काळजी अशी वाटते की, मी ठाण्याला जेव्हा जातो तो धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो.
छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही,असेही त्यांनी सांगितले.
