जितेंद्र आव्हाड यांचे पडले तरी नाक वर, म्हणे मला करायचा हाेता खेळ

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहत आहेत असा दावा करणारl ट्विट डिलिट करण्याची नामुष्की राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर आली हाेती. पण पडले तरी नाक वर या उक्तीप्रमाणे ती संतांची मजार आहे हे आपल्याला माहित हाेते. पण खाेटे बाेलून कसे खेळ करतात हे दाखवायचे हाेते म्हणून ते ट्विट केल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही दर्ग्या वर गेलो की आम्ही मुसलमान धार्जिणे मग जीतुदिन. मग हा हिंदु द्वेष्ट. मग टाकायचे घाणेरडे फोटो घाणेरड्या पोस्ट. औरंगजेबजी वरून किती धावपळ. आम्ही बोललो असतो तर बाप रे बाप. मला माहीत आहे ती संतांची मझार आहे. पण खोटे बोलून कसे खेळ करता येतात हेच दाखवायचे होते.

आव्हाड यांनी हे म्हटले असले तरी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अनेक उतावळ्या लाेकांनी या ट्विटवरून बावनकुळे यांच्यावर टीका करायला सुरूवात केली हाेती. आता आव्हाड  यांनीच हा फाेटाे खाेटा असल्याचे म्हटल्याने त्यांची पंचायत झाली आहे.

स्वत: चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा फाेटाे चंद्रपूर येथील पवित्र मजारचा असून त्यावेळी मुस्लिम परिवारही आपल्यासाेबत हाेते, असे म्हटले हाेते. त्यामुळे आव्हाड यांना ट्विट डिलिट करावे लागले. त्यांनी ट्विट डिलिट केल्याचा भांडाफाेड भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून करण्यात आला. त्यानंतर हा खेळ हाेता असे म्हणण्याची उपरती आव्हाड यांना झाल्याची चर्चा आहे.