मुंबई : एकेकाळी ठाेकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेत पक्षांतर्गत लाेकशाही मुल्याप्रमाणे निवडणुका झाला असल्याचा दावा शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी केल्याने कट्टर शिवसैनिकांनाही हसू आवरेनासे झाले. हे नवल कधी घडले असेच ज्येष्ठ शिवसैनिकही विचारतील. शिवसेनेचा जन्मच एकचालकानुवर्ती संघटना म्हणून झाला. आदरणीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जन्मापासून तहहयात प्रमुख राहिले. देशातील इतर पक्षांत अशी उदाहरणे फार कमी आहेत.
पण मुळात शिवसेनेने कधीही पक्षांतर्गत लाेकशाही मानली नाही. ज्येष्ठ लेखक पु.ल. देशपांडे यांनी महाराष्ट्र भूषण साेहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनाेहर जाेशी यांच्यासमाेर शिवसेनेतील ठाेकशाहीवर भाष्य केले हाेते. ते म्हणाले हाेते की, विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा ‘लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो’ वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू?
ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मते शिवसेनेमध्ये कधीही निवड हाेत नाही. आदेश येताे त्याप्रमाणे नियुक्त्या हाेतात. आजपर्यंत एकच निवडणूक झाली. ती म्हणजे उध्दव ठाकरे यांची. 30 जानेवारी 2003 राेजी शिवसेनेच्या महाबळेश्वर इथे झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे एकमताने झालेल्या या एकमेव निवडीत उध्दव यांचे त्यावेळी शिवसेनेत प्रतिस्पर्धी मानले जाणाणे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव सूचक म्हणून पुढे केले हाेते. मात्र, त्यावेळी आपल्यापुढे दुसरा पर्याय नव्हता असे त्यांनी सांगितले हाेते म्हणजे ही निवड काेणत्या पध्दतीने झाली हे लक्षात येते.
त्यामुळेच शिवसेना पक्षांतर्गत लोकशाहीच्या मुल्याप्रमाणे निवडणूक झाल्या आहेत या अनिल देसाई यांच्या दाव्यामुळे सर्वांनाच नवल वाटत आहे.
