भष्ट्राचाराचा धर्म असतो का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी व आयकर खात्याच्या धाडी पडल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ उडाली एकीकडे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे नुकतेच तुरुंगा बाहेर आले आहेत तर राष्ट्रवादीचे दुसरे नेते नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत त्यात ही धाड त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप जनक प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. भारतीय जनता पक्षाकडून कसे सुडाचे राजकारण सुरू आहे असे बोलले जाते. यावर हसन मुश्रीफ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली, आपल्यावर होणारी कारवाई जाती-धर्माला समोर ठेवून केली जात आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    जाती-धर्माला समोर ठेवून कारवाई होत आहे असं एक मंत्री राहिलेला व्यक्ती बोलतो हे न शोभणार आहे. अशाप्रकारे ते या कारवाईला राजकीय रंग देऊ पाहत आहेत. आपल्यावरील आरोप कुठे आहेत आपण या कारवाईला सामोरे जाऊ पण त्याचवेळी त्याला जातीय-धार्मिक वळण देणे हे चुकीच आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्यावर कारवाई होण्यापूर्वी नवाब मलिक यांच्यावर देखील कारवाई झाली. आता माझ्यावर कारवाई व यानंतर असलम शेख यांच्यावर ही कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले. कुठेतरी जातीय किंवा धार्मिक भूमिकेतून ही कारवाई झाली. अशी शंका माझ्या मनात येते असं यावेळी मुश्रीफ म्हणाले, अशाप्रकारे ते जातीय राजकारण करताना दिसून येत आहेत. यामध्ये आपण मुस्लिम असल्याने आपल्यावर कारवाई होत असल्याचं ते भासवत आहेत असे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसत आहे.

    आता त्यांच्यावर चुकीचे व्यवहार व काही घोटाळे केल्याचा आरोप आहे. अशा प्रकारची व्यवहार करताना किंवा काही घोटाळे करताना तुम्हाला धर्म कुठे आडवा येत नाही. परंतु तुमच्यावर आरोप झाले की लगेच जातीचे आणि धर्माचे राजकारण तुम्ही करता व आपण कसे बळी ठरत आहोत हे भासवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावी असा प्रयत्न यातून होताना दिसतोय. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. अटकेच्या आधी त्यांनी आपल्या आईची भेट घेतली होती. त्यांचे औक्षण करण्यात आले, जेलमधून त्यांनी आईला पत्र देखील लिहिले. अशाप्रकारे त्यांच्या वरील कारवाईचं भांडवल केलं, सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता असंच काहीतरी हसन मुश्रीफ करताना दिसत आहेत.

   खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांवर असे आरोप याआधी झाले आहेत. हसन मुश्रीफ हे काही पहिलेच नेते नाहीत या आधी शरद पवार, अजित पवार, अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्यावर देखील असे आरोप झाले आहेत. आरोप जेव्हा होतात तेव्हा ईडी किंवा सीबीआय कारवाई करतात तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असतात किंवा त्या संबंधित तक्रारी आलेले असतात. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी ते छापा टाकतात किंवा चौकशी करतात. जर तुम्ही काही केलं नसेल तुम्ही स्वच्छ असाल तर मग चौकशीला सामोरे जाण्यास काहीच वावगं नाही व अशा कारवायांवर जाती धर्माचे राजकारण करणे हे देखील योग्य नाही.