अमाेल मिटकरींंच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा पुन्हा जातीय ध्रुवीकरणाचा डाव

पुणे : जागर यात्रा काढून महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरणाचा डाव टाकलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसने अमाेल मिटकरी यांच्या माध्यमातून पहिले पाऊल उचलले आहे. पुणे शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीटही केले आहे. “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार,” असे अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी साेन्याच्या नांगराने नांगरणी करून उध्वस्त पुनवडीला पुणे बनविले हाेते. शिवरायांच्या इतिहासात पुण्याचे विशेष महत्व आहे. मात्र, तरीही ही मागणी करून मिटकरी यांनी जातीय ध्रुवकरणाचा डाव टाकल्याची टीका केली जात आहे. हिंदू महासंघाने याबाबत म्हटले आहे की, जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदनीय आहेत, मात्र पुणे शहराला त्यांचे नाव देणे उचित होणार नाही. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या शहराचे नाव बदलले नव्हते. त्याऐवजी राजमाता जिजाऊ यांचे लाल महाल येथे स्मारक उभारण्यात यावे. हिंदू महासंघाची ही जुनीच मागणी आहे.