चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची तारीख जाहीर

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतंच निधन झालं. या दोन्ही आमदारांच्या जागी आता पोट निवडणूक घेतली जाणार आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

ज्यावेळी एखाद्या आमदाराचं आकस्मिक निधन होतं, त्यावेळी सदर पक्षाद्वारे ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी अथवा विनंती केली जाते. या राजकीय परंपरेनुसार, भाजपतर्फे ही अशी मागणी करण्यात येईल, असं म्हटलं जातंय. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही जगांसाठी दावेदारी सुरु झाली आहे. त्यामुळे दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध होईल की चुरशीची निवडणूक होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.