मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली हाेती. त्याची आश्वासनपूर्ती हाेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात तब्बल ८१६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून पदे भरली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. या उमेदवारांचा पे स्केल १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० या दरम्यान असणार आहे. लिपिक टंकलेखक : ७ हजार ३४ पदे, वित्त विभाग कर सहाय्यक : ४६८ पदे, सहायक कक्ष अधिकारी : ७० पदे, वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक : १५९ पदे, गृह विभाग पोलीस उपनिरीक्षक : ३७४ पदे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग : ८ पदे, यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.
