मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय घडलं? नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? हे सर्व गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. फडणवीस यांना रात्री उशिरा शिंदे यांची भेट घेण्याची गरज का पडली? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाकडे काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात ‘धनुष्यबाण’ या चिन्हा वरून सुनावनी झाली. न्यायालयाने निर्णय जरी राखून ठेवला असला, तरी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान या विषयावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधानांचा दौरा संपूण दुसरा दिवस उजाडत नाही तोच मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणार होते. मात्र काही कारणास्तव हा देखील दौरा रद्द झाला आहे. अशातच उपमुख्यमंत्री रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते.या तिघांच्या भेटी मागचं कारण अस्पष्ट असून दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली.यानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, येत्या 23 जानेवारी रोजी विधान भवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. या सोहळ्यासंदर्भात शिंदे-फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. या कार्यक्रमाच आमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे.
