ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी राजा ठाकूर यांना सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांना त्याबाबतचं पत्रंही दिलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या या आरोपांमुळे ठाकूर कुटुंबही संतापले आहे. राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी थेट कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.यासोबतच त्यांनी सांगितले की मी खूपवेळा शिवसेनेकडून लढले आहे. मी अजूनही शिवसेनेत आहे. माझे पती आता त्यांना गुंड दिसतात असे राजा ठाकूर यांच्या पत्नी म्हणाल्या.
पूजा ठाकूर यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. पूजा ठाकूर यांनी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केलं आहे. त्याविरोधात मी पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे, असं पूजा ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर यांना मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी काल सकाळी केला होता. त्यामुळे पूजा ठाकूर यांनी ही तक्रार केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना संजय राऊत यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. माझी खात्रीची माहिती आहे. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
