एमपीएससीच्या प्रश्नात केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या वयात अशा प्रकारची नौटंकी करणे योग्य नाही, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी रात्री पुण्यात अभ्यासक्रम बदलाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावर टीका करताना दरेकर म्हणाले एमपीएससीच्या प्रश्नावर 80 वर्षाचा योद्धा मैदानात उतरल्याचे कौतुक त्यांच्या बगलबच्यांकडून सुरू आहे. मात्र एमपीएससीचा प्रश्न त्यांच्याच पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात सुरू झाला. तेव्हा आपण काळजी घेतली नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा तीन-तीन महिने संप होता. आपल्या घरापर्यंत संप आला. शिक्षकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न होते. त्यामध्ये लक्ष घालायला वेळ मिळाला नाही. म्हणून आता केवळ विरोध करण्यासाठी अशा प्रकारचे राजकारण आणि नौटंकी केली जात आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे काही पडले नाही. राज्यकर्ते गांभीर्याने या विषयात लक्ष घालून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करतील.
