शरद पवार यांनी कदाचित देशातील 3 राज्याचे निकाल पाहिले नसावे – चंद्रशेखर बावनकुळे

कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात महाविकास आघाडी कसब्यात विजयी झाली आहे. या पार्श्भूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसत असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. पवार साहेबांनी कदाचित देशातील 3 राज्याचे निकाल पाहिले नसावे. त्यांनी अगोदर पाहावे,असे त्यांनी म्हंटले आहे.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी “चिंचवडमध्ये दोघांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही अधिक आहोत. आम्ही ५१ टक्क्यांची लढाई जिंकलीये. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ५१ टक्क्यांची लढाई जिंकून निवडून आल्या आहेत. एकीकडे ४ टक्के मागे पडलो आहोत. ही ४ टक्के मतं भरून काढणं ही आमची जबाबदारी आहे. पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पुन्हा जनतेला विश्वासात घेऊ. काही आमच्याकडून चुकलं असेल तर ते दुरुस्त करू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीच्या निकालावर बोलताना आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजपा मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत,” हे स्पष्ट होत असल्याचे विधान शरद पवार यांनी केले होते